तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीमागे बसवण्यात येत असलेल्या नव्या प्रभावाळीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ही नवी प्रभावाळ शास्त्रानुसार नसून त्यावर वैयक्तिक नावाचा किंवा राजचिन्हाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आक्षेप ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’ने घेतला आहे. ही बाब अत्यंत अशोभनीय असून यामुळे देवीच्या मूर्तीचे पावित्र्य आणि सौंदर्य धोक्यात येत असल्याचे म्हणत मंडळाने या बदलाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
या संदर्भात भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे अंबादासराव कदम-परमेश्वर आणि उपाध्यक्ष सचिन प्रकाशराव पाटील यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी एक निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मंदिर प्रशासनाच्या निर्देशानुसार देवीच्या मूर्तीमागील जुनी चांदीची प्रभावाळ काढून त्याजागी नवीन प्रभावाळ बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही नवी प्रभावाळ पूर्णपणे वेगळी आणि विसंगत आहे. “नूतन प्रभावाळीच्या मध्यभागी व्यक्तीशः नाव असून ते अशोभनीय आहे,” असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
काय आहे मंडळाचा आक्षेप?
भोपे पुजारी मंडळाच्या मते, ‘प्रभावाळ’ म्हणजे देवदेवतांच्या मूर्तीभोवती असलेले तेजाचे वलय. हे तेज दर्शवण्यासाठी सूर्य, सूर्यपुष्प, कीर्तिमुख, नाग यांसारख्या शास्त्रसंमत चिन्हांचा वापर करण्याची परंपरा आहे. श्री तुळजाभवानी देवीच्या मंत्रांमध्येही सिंह, सूर्यपुष्प, कीर्तिमुख, नाग या शुभचिन्हांचा उल्लेख असल्याने प्रभावाळीवर हीच चिन्हे असणे अनिवार्य आहे. मात्र, नव्या प्रभावाळीवर अशास्त्रीय आणि वैयक्तिक राजचिन्हाचा वापर झाल्याने देवीच्या परंपरेला धक्का पोहोचत आहे.
जुन्या प्रभावाळीला मूर्तीचा एक अविभाज्य भाग मानले जात होते आणि त्यामुळे मूर्तीच्या सौंदर्यात भर पडत होती. नवीन आणि पूर्वीच्या प्रभावाळीमध्ये मोठे अंतर असून यामुळे मूर्तीचे मूळ सौंदर्य हरवून जाईल, अशी भीती पुजारी मंडळाने व्यक्त केली आहे.
भाविकांच्या रोषाचा इशारा
मंदिर प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी. देवीची धार्मिक आचारसंहिता, पावित्र्य आणि सौंदर्याचा विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा. प्रभावाळीवर कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा अशास्त्रीय चिन्हांचा समावेश करू नये, अशी मागणी मंडळाने केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तमाम देवीभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
वादाचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, श्री तुळजाभवानी देवीला अर्पण करण्यात आलेली ही नवी चांदीची प्रभावाळ भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी दिली आहे.
या प्रभावाळीच्या मध्यभागी ‘सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून अर्पण’ असा स्पष्ट उल्लेख कोरण्यात आला आहे. देवीच्या मूर्तीमागे लावण्यात येणाऱ्या प्रभावाळीवर अशाप्रकारे दात्याच्या नावाचा उल्लेख करणे हे शास्त्रसंमत नाही, असे सांगत भोपे पुजारी मंडळाने यावर तीव्र आक्षेप घेतला असून याच कारणामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे.