स्थळ: धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय परिसर / वेळ: ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा सकाळचा सोहळा
देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारलेलं होतं. गंपू छाती फुगवून तिरंग्याकडे बघत होता. शेजारी उभा असलेला त्याचा मित्र झंपू मात्र जांभया देत होता.
“काय रे झंपू, देशाचा एवढा मोठा सण आहे आणि तू जांभया देतोयस?” गंपूने विचारले.
“अरे गंपू, सण मोठा आहे, पण इथली नाटकं त्याहून मोठी आहेत. बघ आता काय होतंय ते,” झंपू डोळे मिचकावत म्हणाला.
तेवढ्यात सूत्रसंचालकाने घोषणा केली, “आणि आता, शासनाच्या महसुली योजना १०० दिवसांत जनतेपर्यंत अत्यंत ‘चांगल्या’ पद्धतीने पोहोचवल्याबद्दल, ‘वाझे सिस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅडमचा सत्कार करत आहेत माननीय मुंबईकर !”
टाळ्यांचा कडकडाट झाला. गंपूचा मात्र स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. तो झंपूकडे वळला, “अरे झंपू, ह्या त्याच वाझे मॅडम ना, ज्यांच्यामुळे आपल्या चुलत्याची फाईल ‘वजना’शिवाय पुढे सरकत नाही?”
झंपू हसला. “हो गंपू, ह्या त्याच आहेत. पण तू गैरसमज करून घेतोयस. त्यांना मिळणारा पुरस्कार अगदी योग्य आहे.”
“योग्य? कसा काय?” गंपूचा गोंधळ उडाला.
झंपूने गंपूच्या खांद्यावर हात ठेवून समजावणीच्या सुरात म्हटले, “अरे वेड्या, बघ…
१. शेतकऱ्यांची प्रकरणं धूळ खात पडली आहेत, असं तुला वाटतं? अरे नाही! मॅडम त्या फाईल्सना ‘अँटिक व्हॅल्यू’ येईपर्यंत जपून ठेवतात. आणि ‘सस्ती अदालत’ मध्ये पैसे घेतल्याशिवाय निर्णय देत नाहीत, याला ‘प्रशासकीय शुल्क’ म्हणतात. त्यातून शासनाचाच महसूल वाढतोय. याला म्हणतात ‘महसुली दूरदृष्टी’!”
गंपू ‘आ’ वासून ऐकत होता.
झंपू पुढे म्हणाला, “२. एन. ए. लेआउट प्रकरणात अनियमितता? छे छे! तो तर ‘अर्बन प्लॅनिंग’मधला एक धाडसी प्रयोग होता. शहराचा नकाशा थोडा ‘क्रिएटिव्ह’ पद्धतीने बदलला तर बिघडलं कुठे? याला म्हणतात ‘आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग’!”
“आणि त्या १०० कोटींच्या मालमत्तेचं काय?” गंपूने दबक्या आवाजात विचारले.
झंपूने विजयी मुद्रेने सांगितले, “अरे, ते तर ‘आत्मनिर्भर भारता’चं सर्वोत्तम उदाहरण आहे! सरकारी पगारात राहून १०० कोटींची माया जमवणं येड्यागबाळ्याचं काम आहे का? हे तर ‘आर्थिक व्यवस्थापना’तील एक आदर्श मॉडेल आहे, जे मॅडमनी स्वतः सिद्ध करून दाखवलंय. ACB चौकशी? ती तर केस स्टडी आहे, पुढच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी!”
तेवढ्यात मुंबईकर प्रशस्तीपत्रक वाचू लागले, “धाराशिवच्या सुकन्या, महसूल विभागाच्या दीपस्तंभ, ज्यांनी प्रशासकीय कामात ‘अर्थपूर्ण’ संवाद साधून अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली… त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत!”
‘अर्थपूर्ण’ शब्दावर झंपूने अशी काही टाळी मारली की गंपू दचकलाच.
वाझे मॅडम चेहऱ्यावर अत्यंत प्रामाणिक भाव आणून, विनम्रपणे पुरस्कार स्वीकारत होत्या. हे दृश्य पाहून गंपूच्या डोळ्यासमोर अक्षरशः काजवे चमकले. त्याला प्रश्न पडला की आपण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला आलोय की कोणत्यातरी विनोदी नाटकाच्या प्रयोगाला!
- बोरूबहाद्दर