कळंब (धाराशिव): आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून एका दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना कळंब शहरातील दत्तनगर भागात घडली आहे. या मारहाणीत संशयित आरोपींनी महिलेच्या हाताच्या अंगठ्याला जोरात चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिता मधुकर पवार (वय ३० वर्षे, रा. मंगरूळ, ता. कळंब) आणि त्यांचे पती १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास कळंब येथील दत्तनगर भागात होते. यावेळी आरोपी सुनील कल्याण पवार आणि प्रकाश कल्याण पवार (दोघे रा. कल्पनानगर, कळंब) यांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला.
हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी सुनिता पवार आणि त्यांच्या पतीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, आरोपींनी सुनिता पवार यांच्या हाताच्या अंगठ्याला जोरात चावा घेतला, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणी सुनिता पवार यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून आरोपी सुनील पवार आणि प्रकाश पवार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






