ढोकी – मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या शेतात जबरदस्तीने घुसून ट्रॅक्टरच्या साहाय्याने उभे पीक उध्वस्त केल्याची संतापजनक घटना तेर (ता. जि. धाराशिव) येथे घडली आहे. या घटनेत सदर महिलेचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, तिला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखुबाई माणिक पेठे (वय ७६ वर्षे, रा. तेर) असे फिर्यादी वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या आपल्या शेतात गट नं. ११२० मध्ये शेती करतात. दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १०:३० च्या सुमारास गावातीलच आरोपी शंकर यशवंत कदम, शितल उर्फ नागुबाई शंकर कदम आणि महादु शंकर कदम हे फिर्यादीच्या शेतात आले.
आरोपींनी जुन्या कारणावरून वाद उकरून काढत, ट्रॅक्टर चालकाशी संगनमत करून सखुबाई यांच्या शेतात बेकायदेशीरपणे कब्जा केला. त्यानंतर उभ्या पिकात ट्रॅक्टर घालून पिकाची नासाडी केली. या प्रकारात फिर्यादीचे सुमारे ३ ते ३.५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावेळी जाब विचारला असता, आरोपींनी वृद्ध महिलेला शिवीगाळ करत “तुम्हाला जिवे ठार मारू,” अशी धमकी दिली.
या घटनेमुळे घाबरलेल्या सखुबाई पेठे यांनी दि. २३ जानेवारी २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शंकर कदम, शितल कदम आणि महादु कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३२९, ३२४, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






