प्रिय संतोष देशमुख,
तुम्ही आता कुठे असाल, कुठल्या न्यायव्यवस्थेच्या दरबारात उभे असाल, माहीत नाही. पण तुम्ही नाहीत हे मात्र ठाम सत्य.
तुमच्या खुनाचे फोटो मी बघितले नाहीत. बघण्याची हिम्मत झाली नाही. त्या छायाचित्रांमधून डोकावणारा नरसंहार मी पाहू शकलो नाही. पण एक विचार मनात कायमचा गारठून राहिला – हे सगळं सहन करताना तुम्ही काय अनुभवलं असेल?
मी उगाच स्वतःला तुमच्या जागी ठेवलं. मारहाण होत असताना, शरीर थकून कोसळताना, मृत्यूचे सावट जसजसे जवळ येत गेले असेल, तसतसे तुम्ही काय विचार करत असाल?
शेवटच्या क्षणी तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांचे चेहरे दिसले असतील का? की त्या हैवानांच्या निर्लज्ज हसण्यांनी तेही पुसून टाकले असतील?
आणि शेवटी… त्या लायटरच्या ज्वालेत डोळे जळाले, अंधार झाला. जिवंतपणीच एक दृष्टीहीन, हतबल मृत्यू.
काल वन्यजीव दिन झाला. या दिनाचे औचित्य साधून तुमच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर फिरत होते. कुणाला तरी राजीनामा द्यायला लावायचा होता, म्हणून.
ही व्यवस्था कुणाला न्याय देत नाही, पण कधीमधी राजकीय गणिते जुळवण्यासाठी एखाद्या प्रकरणाला उचलते. मग तिथे भावनांचा, संवेदनशीलतेचा, कायद्याचा काही संबंध नसतो.
तुमची हत्या हे क्रौर्याच्या परिभाषेतील एक भीषण पान आहे, पण यात जास्त अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे त्यानंतरच्या घटना.
एका मंत्र्याने, एका सत्ताधारी नेत्याने “त्याचे पानही हलत नाही, तोच खरा शक्तिमान!” अशी गर्विष्ठ घोषणा केली.
आणि समोर उभ्या असलेल्या गर्दीने टाळ्या वाजवल्या!
त्या टाळ्यांच्या गडगडाटात तुमच्या जळणाऱ्या देहाचा एक थेंबही कुणाच्या मनाला स्पर्श करू शकला नाही.
या राज्यात खैरलांजी विसरला जातो. नितीन आगे विसरला जातो.
पारधी आणि भटक्यांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहिले जात नाहीत.
मग संतोष देशमुख तरी कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार?
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोडग्या, मुर्दाड व्यवस्थेचा चेहरा घेऊन वावरतेय. इथं सत्ताधारी गुन्हेगारांना पाठिंबा देतात, त्यांची गणितं जुळवतात, आणि कुणी त्यावर बोलायला लागलं की राजीनाम्याचा सर्कशीतला विदूषक नाचवला जातो.
राजीनामा म्हणजे शिक्षा नाही, ही फक्त सोय आहे!
जेव्हा एका मंत्र्याचा गुन्हेगार मित्र सरकारपुरस्कृत अभय घेतो, तेव्हा राजीनामा ही निव्वळ एक राजकीय खेळी ठरते.
तुमचं काय चुकलं संतोष?
तुम्ही चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध उभे राहिलात.
त्याच्या दोन कोटींच्या खंडणीचा वाटा मागितला असता, तर तुमचं आयुष्य वाचलं असतं.
तुमचाही वाटा मिळाला असता, तुम्हीही निवडणुकीचे पोस्टर छापले असते, तुम्हीही या असल्या व्यवस्थेचा भाग झालात असता.
पण नाही, तुम्ही लढलात… म्हणून तुम्हाला संपवलं.
तुमच्या मृत्यूने सत्ता ढवळली नाही, विरोधी पक्षाचा आवाजही अरण्यरुदन झाला. तुमच्या मुलीचा टाहो ऐकूनही पाषाणहृदयी राज्यकर्त्यांनी एक क्षणभरही मान झुकवली नाही.
आजही प्रश्न तोच आहे – तुम्हाला संपवणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईल का?
की राजकीय गणिते जुळवून सगळे आपापल्या खुर्च्या सांभाळत बसणार?
मला उत्तर माहितीय संतोष…
तुमच्यासारख्यांना न्याय मिळत नाही.
फक्त तुमच्या मृत्यूचा मखलाशी उपयोग केला जातो.
आणि तेव्हा जाणवतं –
लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथे ओरडण्याची मोकळीक असते.
आणि सर्वात मोठा तोटाही तोच – की त्या ओरडण्याचा काहीही उपयोग नसतो!
– सुदीप पुणेकर