धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील धोकादायक वर्गखोल्या आणि शाळेतील वीज बिल भरण्यासाठी निधीची कमतरता असल्याची समस्या आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात मांडली. त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवत स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले.
आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेचा सेस आणि जिल्हा नियोजन समितीमधून पाच टक्के निधी देण्याची तरतूद असली तरी ती अपुरी पडत आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या ५९४ धोकादायक वर्गखोल्या आहेत. मात्र, नियोजन समितीच्या पाच टक्के निधीतून केवळ ८२ वर्गखोल्यांचेच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित ५१४ वर्गखोल्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, समग्र शिक्षण योजनेतूनही ही कामे केली जातील असे सांगण्यात आले होते, परंतु अद्याप त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसून आलेला नाही. शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा असूनही वीजबिल व्यावसायिक दराने आकारले जात आहे, हे अन्यायकारक आहे. वीजबिलासाठी सवलतीच्या दराने आकारणी करण्यात यावी आणि या खर्चासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.
या मागणीवर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी उत्तर देताना सांगितले की, धोकादायक वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, सध्याचा निधी अपुरा असल्याची कबुली त्यांनी दिली. धोकादायक वर्गखोल्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच, वीजबिलासाठी व्यावसायिक दर लागू न करता सवलतीच्या दराने आकारणी करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
धोकादायक वर्गखोल्या आणि वीज बिलासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार कैलास पाटील यांनी आवाज उठवल्याने शिक्षण क्षेत्रातील समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. सरकारकडून तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.