बेंबळी – धाराशिव तालुक्यातील दारफळ गावामध्ये वाळू भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. हल्ला १५ एप्रिल रोजी झाला असला तरी, जखमीच्या आईने १८ एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दारफळ येथील नदीपात्रात घडली. फिर्यादी द्रोपदी फकीर ओहळ (वय ४२, रा. दारफळ) यांचा मुलगा महेश फकीर ओहळ हा नदीत वाळू भरत असताना, आरोपी निखील जयराम क्षिरसागर (रा. दारफळ) याने त्याला हटकले. वाळू पोत्यात भरण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
या वादानंतर आरोपी निखील क्षिरसागर याने महेश ओहळ याला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि हातातील खोऱ्याने (फावडे) त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात महेश ओहळ गंभीर जखमी झाला असून, त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जखमी तरुणाच्या आई, द्रोपदी फकीर ओहळ यांनी दि. १८ एप्रिल २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या प्रथम खबरेवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपी निखील जयराम क्षिरसागर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत. आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.