धाराशिव: भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ही घोषणा केली. कुलकर्णी यांची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१९ या काळात जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या मागील कार्यकाळात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका पार पडल्या होत्या, ज्यामध्ये पक्षाने उल्लेखनीय यश संपादन केले होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर कुलकर्णी यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ते पक्षाचे निष्ठावंत सदस्य असून, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या निवडीमुळे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना शह दिला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दत्ताभाऊ कुलकर्णी हे केवळ राजकारणातच नव्हे, तर सहकार आणि उद्योग क्षेत्रातही सक्रिय आहेत. ते सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक असून, जिल्ह्यात त्यांचे दोन गूळ पावडर कारखाने आहेत. तसेच, त्यांच्या मल्टीस्टेट बँकेच्या १० शाखा कार्यरत आहेत. एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांची प्रतिमा जिल्ह्यात आहे. त्यांच्या या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.