धाराशिव : जिल्ह्यातील नळदुर्ग येथे एका यशस्वी सापळा कारवाईत मंडळ अधिकारी जयंत गायकवाड आणि महसूल सहाय्यक बाळासाहेब पवार यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या 20 गुंठे जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॉयल्टी भरून कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात या अधिकाऱ्यांनी 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर त्यांनी 10,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती अँटी करप्शन ब्युरोला दिल्यानंतर, आजच्या दिवशी सापळा रचून दोन्ही आरोपींना लाच स्वीकारताना पकडण्यात आले. कारवाईमध्ये मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी महसूल सहाय्यक बाळासाहेब पवार यांच्या मार्फत लाच स्वीकारली. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात तुळजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
- एका तक्रारदाराने आपल्या शेतीतील जमिनीवरील खोदकामासंदर्भात कोणतीही कारवाई न करण्यासाठी गायकवाड यांनी 15,000 रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ACB कडे केली.
- तडजोडीनंतर ही रक्कम 10,000 रुपयांवर आली.
- या तक्रारीवरून ACB ने सापळा रचला.
- आज, 3 सप्टेंबर 2024 रोजी पवार यांनी गायकवाड यांच्या वतीने तक्रारदाराकडून 10,000 रुपये लाच स्वीकारताच दोघांनाही अटक करण्यात आली.
- दोन्ही आरोपींविरुद्ध तुळजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
- पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
अँन्टी करप्शन ब्युरोचे आवाहन
- कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव यांच्याशी संपर्क साधावा.
- संपर्क
- दुरध्वनी क्र.: 02472-222879
- टोल फ्री क्र.: 1064