धाराशिव – धाराशिव नगर परिषदेअंतर्गत ५९ रस्त्यांच्या कामासाठी मंजूर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या निधीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा निधी “मर्जीतल्या लाडक्या गुत्तेदाराला” १५ टक्के जादा दराने देण्याचा घाट भारतीय जनता पार्टीच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केला आहे.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सुरज साळुंके यांनी १४० कोटींच्या ठेकेदारीवरून सुरू असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला. यावेळी शिवसेनेचे संघटक सुधीर पाटील, शहरप्रमुख आकाश कोकाटे, डी. एन. कोळी आदी उपस्थित होते.
साळुंके यांनी निधीच्या मंजुरीचे श्रेय शिवसेनेला दिले. ते म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला हा भरघोस निधी मिळाला. मात्र, जनतेचे तारणहार म्हणून मिरवणाऱ्या तुळजापूरच्या भाजप आमदाराने चौकाचौकात बॅनर लावून निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.”
२ कोटींच्या ‘डील’चा गौप्यस्फोट
या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करत साळुंके यांनी गंभीर आरोप केला. “१४० कोटींच्या कामात भ्रष्टाचार करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि लाडका गुत्तेदार यांची मुंबईत बैठक कुठे झाली? त्यांच्यामध्ये रोख दोन कोटी रुपयांची ‘डील’ झाली, याचीही माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
उबाठा गट आणि मुख्याधिकाऱ्यांवरही निशाणा
“धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची काही कामे यापूर्वीच झालेली आहेत. तरीदेखील त्याच रस्त्याच्या कामाचे टेंडर पुन्हा काढण्याचे कारण काय?” असा सवाल साळुंके यांनी उपस्थित केला. निधीचा दुरुपयोग करण्याचे पाप नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि भाजपा-उबाठा गटाचे लोक करीत असल्याचेही ते म्हणाले. “धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे शहराचा सत्यानाश झाला आहे. आगामी निवडणूक समोर ठेवून सुरू असलेला हा खेळ जनता ओळखून आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनीही या कामात लक्ष घातले असून, त्यांचे समर्थन आपणास मिळाले असल्याचे साळुंके यांनी सांगितले.
लवकरात लवकर फेरनिविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार
धाराशिव शहरात सध्या चालू असलेल्या राजकारणावर पडदा पाडून शहराचा विकास करण्यासाठी नेहमीच शिवसेना कटिबद्ध असते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आम्ही फेरनिविदा काढून लवकरच शहरवासीयांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करू, असेही सुरज साळुंके यांनी सांगितले.
 
			 
                                






