धाराशिव – धाराशिव शहरातील तब्बल १४० कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचा प्रकल्प अखेर राजकीय श्रेयवादात आणि गटबाजीच्या चिखलात रुतल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘कार्यारंभ आदेश’ मिळाल्याचा, ६० कोटी वाचवल्याचा दावा करत कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारले आणि शहरात मोठमोठे होर्डिंग्ज लावले, तर दुसरीकडे खुद्द शासनाच्या नगर विकास विभागानेच या संपूर्ण प्रक्रियेला ‘तूर्त स्थगिती’ दिल्याचे धक्कादायक पत्र समोर आले आहे.
भाजप आमदार राणा पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वादात हा प्रकल्प अडकल्याची चर्चा असतानाच, आता शासनानेच तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिल्याने आमदारांचे दावे फोल ठरले आहेत.
गेले १८ महिने हा खेळखंडोबा सुरू असून, जिल्ह्याचे ठिकाण असूनही धाराशिव शहरातील रस्ते खड्डेमय आणि धुळीने माखलेले असल्याने नागरिक मात्र नरकयातना भोगत आहेत. आता नगर विकास विभागाने २८ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात, या प्रकल्पाच्या निविदेच्या अनुषंगाने ‘कार्यादेश’ (Work Order) देण्याच्या शिफारशीस ‘तूर्त स्थगिती’ देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात प्राप्त झालेल्या एका तक्रारीची / निवेदनातील वस्तुस्थिती तपासून ‘स्वयंस्पष्ट अहवाल’ शासनास सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
आमदारांचे दावे हवेतच विरले!
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आमदार राणा पाटील यांनी हाच रस्त्यांचा प्रश्न ‘निकाली निघाला’ असल्याची घोषणा करत एक पत्रकार परिषद घेतली होती. निविदेतील २०२३-२४ च्या दरानेच कामे होणार असल्याने ‘जनतेचे साठ कोटी रुपये वाचणार’ असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला होता. इतकेच नव्हे, तर ‘लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन’ होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
या ‘यशाबद्दल’ आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ‘उदो उदो’ करत सत्कारही केला होता. इतकेच नव्हे तर, संपूर्ण शहरात मोठमोठे होर्डिंग्ज लावून या ‘यशाचे’ प्रदर्शनही करण्यात आले होते. विशेष म्हणजे, आमदार पाटलांनी आपल्या पत्रकात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचेही ‘मोलाचे सहकार्य’ लाभल्याचे म्हटले होते.
मात्र, पालकमंत्र्यांसोबतच्या ‘सहकार्याचे’ दावे एकीकडे असतानाच, दुसरीकडे याच दोन नेत्यांमधील वादामुळे प्रकल्प रखडल्याची चर्चा आहे. आता शासनाच्या ताज्या ‘स्थगिती’च्या आदेशामुळे, ६० कोटींच्या बचतीचे दावे, सत्काराचे सोहळे आणि होर्डिंगबाजी हे सर्व हवेतच विरले आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत आणि हा राजकीय वाद मिटेपर्यंत, धाराशिवकरांच्या नशिबी खड्डे आणि धूळच उरली आहे, हेच कटू सत्य आहे.






