धाराशिव: शहरातील समता नगर परिसरातील विसर्जन विहीर ते सुधीर (अण्णा) पाटील डीआयसी रोडपर्यंतच्या रखडलेल्या हॉटमिक्स रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे यांनी 16 जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
उपोषण सुरू होताच नगरपरिषद प्रशासनाने अवघ्या 24 तासांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, हे आश्वासन हवेत विरल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
धुळीने नागरिक त्रस्त, प्रशासन मात्र मस्त!
शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था दयनीय असून, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. काही रस्ते अर्धवट सोडले गेल्याने धुळीचे लोट उडत असून, नागरिकांना श्वसनाचे विकार जडू लागले आहेत. तसेच, खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मणक्याचे विकार होत असल्याचे चित्र आहे.
“सरकारी काम आणि कशावर थांब?” या उक्तीला साजेसेच नगरपरिषद प्रशासनाचे वर्तन असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. 24 तासांत रस्ता सुरू करण्याचे आश्वासन केवळ कागदावरच राहिले असून, प्रशासनाने आंदोलकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नगरपरिषद आता जागे होणार की पुन्हा केवळ आश्वासनांची खैरात करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.