धाराशिव: आज महाराष्ट्र दिन, पण धाराशिवमध्ये फटाके वाजले ते वेगळ्याच बातमीचे! जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब दौऱ्यावर आले, DPC ची ‘वादळी’ बैठक घेतली आणि जाता जाता एक असा बॉम्ब टाकला की महिनाभरापासून सुरू असलेली कुजबुज थांबून थेट ‘कलगीतुरा’च सुरू झाला!
गेल्या महिन्याभरापासून धाराशिवच्या विकासाला २६८ कोटींचा ‘ब्रेक’ लागला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कामांना स्थगिती दिली होती, पण ‘का?’ या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यात होतं. चर्चा तर खूप होत्या, पण खरं कारण काय, हे कुणालाच कळेना.
अखेर आज, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर, पालकमंत्री सरनाईक यांनी या रहस्यावरून पडदा उचलला. DPC च्या वादळी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ही स्थगिती काही हवेत आलेली नाही. यामागे आहेत तुळजापूरचे भाजपचेच आमदार राणा जगजितसिंह पाटील! म्हणे, पाटील साहेबांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे काही कामांमध्ये ‘गडबड’ असल्याची ‘तोंडी’ तक्रार केली होती. आणि मुख्यमंत्र्यांनीही लगेच ‘तथास्तु’ म्हणत पालकमंत्र्यांना पत्र पाठवून कामांना स्थगिती द्यायला लावली.
आता गंमत बघा, स्थगिती मिळून महिना उलटला, पण पालकमंत्री साहेबांनी ‘खलनायक’ कोण, हे आज जाहीर केलं! आणि या गौप्यस्फोटाने फक्त कामांचं काय होणार हा प्रश्न नाही, तर थेट महायुतीतच मतभेदाची ठिणगी पडली आहे. पालकमंत्री सरनाईक (शिवसेना – शिंदे गट) यांनी थेट भाजप आमदाराकडे बोट दाखवल्याने, आता या दोन नेत्यांमध्ये विस्तव जात नसल्याची चर्चा सुरू झालीये. कालपर्यंत सोबत काम करणारे नेते आता एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत म्हणे!
यामुळे झालंय काय, की महायुतीच्या एकीच्या गोड जेवणात आता मिठाचा खडा पडला आहे. एका ‘कानाफुसी’ने फक्त २६८ कोटींची कामंच थांबवली नाहीत, तर थेट युतीतल्या दोन मोठ्या नेत्यांमध्येच ‘कोल्ड वॉर’ सुरू केलं आहे.
थोडक्यात काय: महिनाभरानंतर का होईना, स्थगितीचं खरं कारण कळलं खरं, पण त्या कारणाने आता महायुतीतच ‘कारण’ निर्माण झालं आहे! आता हे २६८ कोटी कधी मार्गी लागणार आणि या दोन नेत्यांमधला ‘रुसवा’ कोण काढणार, हे बघणं भारी इंटरेस्टिंग असणार आहे! 😉
Video