धाराशिव: इच्छित ठिकाणी बदली (पोस्टिंग) करून देण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी आणि आणखी पैशांची मागणी केल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि. १०) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या उपव्यवस्थापकासह दोन लिपिकांना एसीबीने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे महावितरण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
१) उदय दत्तात्रय बारकुल (वय ४१, पद: निम्नस्तर लिपिक, उपकार्यकारी अभियंता कार्यालय, महावितरण, धाराशिव. रा. ज्ञानेश्वर मंदिर पाठीमागे, महात्मा गांधी नगर, धाराशिव) २) भारत व्यंकटराव मेथेवाड (वय ५०, पद: उप व्यवस्थापक, मानव संसाधन (वर्ग-२), विभागीय महावितरण कार्यालय, धाराशिव. रा. आमलेश्वर नगर, लातूर) ३) शिवाजी सिद्राम दूधभाते (वय ४०, पद: उच्च स्तर लिपिक, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव. रा. शाहूनगर, धाराशिव) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
यातील तक्रारदार आणि त्यांच्या मित्राला त्यांच्या नोकरीत इच्छित ठिकाणी पदस्थापना हवी होती. यासाठी वरील तिन्ही आरोपींनी संगनमत करून यापूर्वीच तक्रारदाराकडून २० हजार रुपये आणि त्यांच्या मित्राकडून १० हजार रुपये (एकूण ३० हजार) स्वीकारले होते. पैसे घेऊनही त्यांचे काम झाले नाही. उलट, आरोपी क्रमांक २ भारत मेथेवाड यांनी तक्रारदाराकडे पुन्हा इच्छित पदस्थापनेसाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने २६ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.
एसीबीने २६ आणि २९ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली. यात असे निष्पन्न झाले की, आरोपी उदय बारकुल याने तक्रारदार व त्यांच्या मित्राकडून घेतलेल्या पैशांपैकी १० हजार रुपये उपव्यवस्थापक भारत मेथेवाड यांना आणि १० हजार रुपये लिपिक शिवाजी दूधभाते यांना दिले होते. तिघांनी मिळून समान उद्देशाने ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाले.
यानुसार, मंगळवारी (दि. १०) सापळा पथकाने तिन्ही आरोपींना महावितरण कार्यालयातून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता रोकड, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्या घराची झडती सुरू आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई एसीबी, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, धाराशिवचे पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय वगरे, पोलीस निरीक्षक नरवटे, तसेच अंमलदार जाधव, तावस्कर, डोके आणि हजारे यांच्या पथकाने केली.
आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी केले आहे.
टोल फ्री क्र: १०६४
व्हॉट्सॲप क्र: ९२७०२३१०६४






