मुरुम : जुन्या भांडणाच्या कारणावरून गैरकायदेशीर जमाव जमवून एका व्यक्तीला, त्याच्या पत्नीला व मुलाला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील दहा जणांविरुद्ध मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोहारा तालुक्यातील अचलेर येथे १ ऑगस्ट रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुनिल हरिश्चंद्र राठोड (वय ४१, रा. अचलेर तांडा) यांनी ५ ऑगस्ट रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचलेर येथील विद्या विकास हायस्कूलजवळ ही घटना घडली.
फिर्यादी राठोड हे त्यांची पत्नी व मुलासह असताना, आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना अडवले. आरोपी गणेश राजेंद्र पवार, प्रेम युवराज पवार, राजेंद्र महादेव पवार, युवराज महादेव पवार, तानाजी बाबु पवार, नेताजी बाबु पवार यांच्यासह रेखा राजेंद्र पवार, प्रेमाबाई महादेव पवार, विमल युवराज पवार, आणि कमलाबाई बाबु पवार (सर्व रा. अचलेर तांडा) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून राठोड कुटुंबीयांना शिवीगाळ केली. त्यानंतर सर्वांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
सुनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलिसांनी वरील दहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (118(1), 115(2), 352, 351(2), (3), 189(2), 191(2)(3), 190) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.