धाराशिव: धाराशिव शहरातील सरकारी दवाखान्यात एका ३५ वर्षीय व्यक्तीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याबाबत १८ मे २०२५ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजीम करीम कुरेशी (वय ३५ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहीद अब्बास कुरेशी, सलीम रज्जाक कुरेशी, मोहतसीम कुरेशी, अरशद कुरेशी, गौस कुरेशी आणि आयान कुरेशी (सर्व रा. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी अजीम कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांच्या भावाला का मारले याचा जाब विचारल्याच्या रागातून १४ मे रोजी सायंकाळी सरकारी दवाखान्याच्या आवारात त्यांना गैरकायदेशीररित्या जमाव जमवून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्या, लोखंडी रॉड, दगड आणि वायरने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.