धाराशिव – विधानसभा निवडणुकीच्या बिगुलामुळे धाराशिव विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना जोर आला आहे. सध्याचे आमदार कैलास पाटील, जे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आहेत, यांच्याविरुद्ध महायुती अजून उमेदवार ठरवू शकलेली नाही. या परिस्थितीत “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व” !! अशी जाहिरातबाजी जोरात सुरू आहे.
धाराशिव विधानसभा मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील ५६ गावे, धाराशिव शहर आणि संपूर्ण कळंब तालुका येतो, ज्यात ९५ गावे आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेचे कैलास पाटील यांनी ८७,४८८ मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय निंबाळकर यांना ७४,०२१ मते मिळाली होती.
यंदा शिवसेनेत फूट पडल्याने कैलास पाटील उद्धव ठाकरे गटात सामील झाले आहेत. महाविकास आघाडीने पाटील यांची उमेदवारी निश्चित केली असून त्यांना “शिवसेनेचा वाघ” असे संबोधून ठाकरे यांनी त्यांचा गौरव केला आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसही असल्याने कैलास पाटील यांचा ‘वनसाईड’ विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) किंवा भाजपकडून कोण उतरवले जाईल, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. शिंदे सेनेच्या उमेदवारांमध्ये सुधीर पाटील आणि शिवाजी कापसे आयात उमेदवार आहेत, तर भाजपकडे या भागात जनाधार नाही. त्यामुळे आ. कैलास पाटील यांना सध्या तरी कोणताही तगडा प्रतिस्पर्धी नसल्याचे दिसत आहे.