धाराशिव: शहरात दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या वर्दळीच्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जिल्हा न्यायालय, भाजप भवन आणि सेंट्रल बिल्डिंग अशा महत्त्वाच्या परिसरातून अंदाजे ८०,००० रुपये किमतीच्या दुचाकी लंपास झाल्या आहेत. याप्रकरणी आनंदनगर आणि धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, सारोळा बुद्रुक येथील रहिवासी बालपीर रमजान मुजावर (वय ३२) यांची ४०,००० रुपये किमतीची सुझुकी एक्सेस (क्र. MH 25 BC 3476) ही काळ्या रंगाची दुचाकी ८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० च्या दरम्यान धाराशिव कोर्ट परिसरातून चोरीला गेली. याप्रकरणी त्यांनी २ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दुसऱ्या घटनेत, गुजनूर येथील रहिवासी असलेले सचिन साहेबराव साळुंके (वय ४२) यांची २०,००० रुपये किमतीची होंडा शाईन (क्र. MH 25 AE 7393) ही दुचाकी १० जून रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास धाराशिव येथील भाजप भवन समोरून चोरण्यात आली. त्यांनी याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात २ जुलै रोजी फिर्याद दिली आहे.
तिसरी घटना २७ मे रोजी सेंट्रल बिल्डिंगसमोर घडली. बांगरवाडी येथील समाधान धनाजी बांगर (वय २९) यांची हिरो एचएफ डिलक्स (क्र. MH 13 CF 0224) ही लाल रंगाची, २०,००० रुपये किमतीची दुचाकी दुपारी १.३० ते २.३० च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. या घटनेची तक्रारही २ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.
एकाच दिवशी चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी तक्रारी दाखल झाल्यामुळे शहरात वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.