धाराशिव – धाराशिव शहरातील १४० कोटी रुपयांच्या रस्ता कामांच्या स्थगितीवरून सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप आता नव्या वळणावर पोहोचले आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रवक्ता ऍड. नितीन भोसले यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि उबाठा गट हे “एकाच नाण्याच्या दोन बाजू” असल्याची टीका करत, थेट मित्रपक्षावरच निशाणा साधला आहे. “उबाठाचे आमदार-खासदार जी भाषा बोलत होते, त्याच भाषेत आता आमच्या मित्रपक्षाचे (शिंदे गट) पदाधिकारी बोलू लागले आहेत, त्यामुळे दोघांचीही स्क्रिप्ट एकाच लेखकाने लिहिली आहे,” असा घणाघाती आरोप भोसले यांनी केला आहे.
ऍड. भोसले म्हणाले, “पालकमंत्र्यांच्या पत्रानंतरच शहरातील रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली, हे सर्वांना माहीत असताना, ‘स्थगिती फडणवीस सरकारने दिली’ असे वारंवार सांगण्यातूनच विरोधक आणि आमच्या मित्रपक्षाच्या मनातील सुप्त हेतू उघड होत आहे.”
“चौकशीचे स्वागत, पण…”: भाजपने उपस्थित केले सहा सवाल
या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचे भाजपने स्वागत केले असल्याचे सांगत, ऍड. भोसले यांनी या निविदा प्रक्रियेबरोबरच इतरही बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. “ज्याबाबत उबाठाचे आमदार-खासदार आणि आमचे मित्रपक्षातील पदाधिकारी सोयीनुसार मूग गिळून गप्प बसले आहेत, त्या मुद्द्यांचीही चौकशी व्हावी,” असे ते म्हणाले.
ऍड. भोसले यांनी उपस्थित केलेले चौकशीचे मुद्दे:
- १४० कोटींच्या कामासाठी संभाजीनगरचा ठेकेदार कोणाच्या माध्यमातून आणला गेला?
- त्या ठेकेदाराला काम मिळत नाही हे पाहून तत्कालीन मुख्याधिकारी फड यांच्यावर दबाव कोणी आणला?
- मुख्याधिकाऱ्यांना सहा महिने टेंडर उघडू न देण्यासाठी कोणाकडून दबाव टाकण्यात आला?
- मुख्याधिकारी दबावाखाली येत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कोणाच्या सांगण्यावर तयार झाला?
- गेली नऊ महिने ही प्रक्रिया रखडवण्यासाठी विविध व्यक्तींच्या माध्यमातून अडथळे कोणी निर्माण केले?
- ज्याला अखेर कंत्राट मिळाले, त्या ठेकेदारासोबत वाटाघाटींसाठी बैठका कोणी घेतल्या?
‘माता-भगिनींची बदनामी थांबवा’
स्थगितीविरोधात धाराशिव शहरातील माता-भगिनींनी केलेल्या आंदोलनाला भाजपने उघड पाठिंबा दिला होता व काही भाजप महिला कार्यकर्त्या समर्थनासाठी उपस्थित होत्या, याचा चुकीचा अर्थ लावून आंदोलनकर्त्या माता-भगिनींची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही भोसले यांनी केला.
“आमच्या विरोधकांनी (उबाठा) पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देत त्यांचा गैरसमज निर्माण केला, अशी स्पष्ट भूमिका आम्ही पूर्वीच मांडली होती. आज मित्र पक्षाने (शिंदे गट) घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे आमच्या याच आरोपांना पुष्टी देणारे आहेत. धाराशिव शहरातील जनतेला न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा पाठपुरावा सुरूच राहील,” असेही ऍड. नितीन भोसले यांनी स्पष्ट केले.
 
			 
                                






