धाराशिव: नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर आता भारतीय जनता पार्टीने (भाजप) धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून पूर्ण ताकतीने लढवण्याचा निर्धार भाजपने केला असून, पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. अवघ्या चार दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल ७१२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या आठ नगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे. धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरूम पालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले, तर भूम आणि परांडा येथे पक्षाला संमिश्र यश मिळाले. या निकालांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, आता जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
इच्छुकांचा मोठा प्रतिसाद
पक्षाच्या कार्यालयात उमेदवारीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
-
पंचायत समिती (११० जागा): सुमारे ३९२ इच्छुक.
- जिल्हा परिषद (५५ गट): तब्बल ३२० इच्छुक.
एकूण ७१२ जणांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केल्याने भाजपची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ही निवडणूक माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, “पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही.”
तसेच, कार्यकर्ता संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून निवडणुकीची रणनीती आखली जात असून, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले आहे. नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही महायुती ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.





