धाराशिव : धाराशिव येथील बस स्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी घडला असून, याप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शामल लक्ष्मण खैरे (वय ४०, रा. हिंगळजवाडी, ता. जि. धाराशिव) या २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास धाराशिव बस स्थानकातून बार्शीला जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या.
यावेळी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत, एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील बटव्यात ठेवलेले २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ९,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर शामल खैरे यांनी ३ नोव्हेंबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.





