धाराशिव: शहरातील एका व्यापाऱ्याकडून येणारी ९ लाख ३८ हजार रुपयांची थकबाकी परस्पर स्वतःच्या फोन पे खात्यावर स्वीकारून एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असद खान अशरफ खान पठाण (वय ४९, रा. मिली कॉलनी, धाराशिव) यांचे समर्थ नगर परिसरात ‘फर्म इंडिया फुट लाईन’ नावाचे पादत्राणांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील थकबाकीची रक्कम तीन आरोपींनी संगनमत करून असद खान यांना न देता परस्पर स्वतःच्या मोबाईल नंबरवर स्वीकारून अपहार केला.
या प्रकरणी शाहरुख शौकत शेख (रा. समर्थ नगर, धाराशिव), युसूफ पटेल (रा. कुंभारवाडी, ता. जि. धाराशिव), आणि आसेफ पठाण (रा. समर्थ नगर, धाराशिव) या तिघांवर फसवणुकीचा आरोप आहे. आरोपींनी संगनमत करून, एका व्यापाऱ्याकडून येणारी ९,३८,००० रुपयांची रक्कम स्वतःच्या ७३७८६४४३९० या मोबाईल क्रमांकाच्या फोन पे खात्यावर स्वीकारली व रकमेचा अपहार करून असद खान यांची फसवणूक केली.
या घटनेप्रकरणी असद खान यांनी २१ जुलै २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) (फसवणूक), ३१८(४) (अपहार), ४९ (गुन्हेगारी कट रचणे) आणि ३(५) (समान उद्देशाने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.