धाराशिव: येथील एका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून बँक खाती उघडत त्याद्वारे तब्बल ३ कोटी ३५ लाख ९८ हजार २९२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी असद खान मुस्तफा खान पठाण (ह.मु. हैदराबाद, तेलंगणा) आणि रुपेश सावरदेकर (रा. सांगली) या दोघांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान इक्बाल पठाण (वय ३४, रा. दर्गाह रोड, गाझीपुरा, धाराशिव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलमान पठाण हे ह्युमन हेल्थ केअर रिसोर्सेस चॅरिटेबल ट्रस्ट, धाराशिवचे उपाध्यक्ष आहेत. आरोपी असद खान याने ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नावाने बनावट नोटरी तयार केली. या नोटरीवर उपाध्यक्ष व इतर पाच सदस्यांच्या खोट्या सह्या आणि अंगठे घेण्यात आले. या बनावट नोटरीच्या आधारे आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा काळा मारुती जवळ, धाराशिव आणि इंडियन बँक शाखा बार्शी नाका, धाराशिव येथे ट्रस्टच्या नावाने बँक खाती उघडली.
या बँक खात्यांमध्ये सांगली येथील आरोपी रुपेश सावरदेकर याने क्रिकेट सट्टा (आयपीएल क्रिकेट मॅच) किंवा ऑनलाईन गेम सट्ट्यातून मिळालेली रक्कम जमा केल्याचा आरोप आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन बँकेच्या धाराशिव शाखांमधील ट्रस्टच्या खात्यांमध्ये एकूण ३,३५,९८,२९२ रुपये फिर्यादी आणि ट्रस्टच्या इतर सदस्यांच्या संमतीशिवाय वापरून त्यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ०७ जानेवारी २०२५ ते १४ मार्च २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सलमान पठाण यांनी २७ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(५), ३३८, ३३६(३), ३४०(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे सामाजिक कार्यासाठी असलेल्या ट्रस्टचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.