नळदुर्ग –तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे ग्रामपंचायत ठरावाच्या रजिस्टरवर सही का करत नाही, या कारणावरून झालेल्या वादात दोन भावांना काठी आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मिलींद मारुती होगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चिवरी येथील बसवेश्वर महाराज चौकात घडली. फिर्यादी मिलींद मारुती होगाडे (वय ३२) आणि त्यांचे भाऊ विठ्ठल होगाडे हे चौकात असताना आरोपी सचिन विजय बिराजदार, अनिल विजय बिराजदार, प्रशांत पंडीत बिराजदार, रुपेश चंद्रकांत बिराजदार, ओमप्रकाश प्रभाकर बिराजदार, जयप्रकाश बिराजदार आणि अजय महादेव झिंगरे (सर्व रा. चिवरी) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवला.
आरोपींनी “तुम्ही ग्रामपंचायत ठराव घेतलेल्या रजिस्टरवर सह्या का करत नाही?” असा जाब विचारत फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी मिलींद व विठ्ठल होगाडे यांना लाथाबुक्यांनी, काठीने आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
घटनेनंतर मिलींद होगाडे यांनी २७ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.