धाराशिव: छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चोराखळी येथील कला केंद्रासमोरील हल्ल्याच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, या प्रकरणातील एका जखमीनेच गोळीबार झाल्याचा दावा केल्याने येरमाळा पोलिसांच्या तपासावर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मारहाणीत दोघे जखमी असताना, तिसऱ्याच व्यक्तीला फिर्यादी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम खबर अहवालानुसार (FIR), ही घटना गोळीबाराची नसून फरशी, दगड आणि लाकडी दांड्याने झालेल्या जबर मारहाणीची आहे. सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास चोराखळीतील महाकाली कला केंद्रासमोर जुन्या वादातून हा हल्ला झाला. यात संदीप यल्लाप्पा भुट्टे आणि रोहीत जाधव हे दोघे जखमी झाले आहेत.
जखमीचा दावा आणि फिर्यादीचा घोळ
या प्रकरणातील जखमी रोहीत जाधव याने प्रसारमाध्यमांशी बोलताना “गोळीबार झाला होता,” असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे “येरमाळा पोलीस ही माहिती का लपवत आहेत आणि ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?” असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या मारहाणीत संदीप भुट्टे आणि रोहीत जाधव जखमी झाले असताना, पोलिसांनी त्यांच्याऐवजी तौसीफ सिकंदर तांबोळी यांना फिर्यादी करून घेतले आहे. तांबोळी यांच्या फिर्यादीनुसार, भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मुक्का मार लागला.
केंद्राचे डान्सबारमध्ये रूपांतर? पोलिसांचे दुर्लक्ष
स्थानिकांच्या माहितीनुसार, चोराखळी येथील हे कलाकेंद्र आता नावापुरतेच उरले असून, त्याचे रूपांतर डान्सबारमध्ये झाले आहे. येथे पारंपरिक वाद्यांऐवजी डीजेच्या दणदणाटावर महिलांना नाचवले जाते. यामुळे येथे आंबटशौकिनांची गर्दी वाढत असून, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याने हाणामारीच्या घटना वारंवार घडत आहेत. हे केंद्र पहाटेपर्यंत सुरू राहत असूनही पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
FIR नुसार घटनेचा तपशील
तौसीफ तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संदीप भुट्टे यांनी सेंट्रिंगच्या कामाचे बोलण्यासाठी बोलावले होते. ते गाडीतून महाकाली कला केंद्राजवळ पोहोचले असता, पवन पोळ, अक्षय साळुंके, राज पवार, विजय साळुंके आणि इतर चार-पाच अनोळखी व्यक्तींनी जुन्या वादातून भुट्टे आणि जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन पोळने फरशीने, अक्षय साळुंकेने दगडाने, तर राज पवारने लाकडी दांड्याने संदीप भुट्टे यांना गंभीर जखमी केले. तसेच विजय साळुंकेने रोहीत जाधव यांना फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. यानंतर जखमींना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येरमाळा पोलिसांनी पवन पोळ, अक्षय साळुंके, राज पवार, विजय साळुंके आणि इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, गोळीबाराच्या दाव्यामुळे आणि फिर्यादीच्या निवडीमुळे हा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.