धाराशिव : शहरातील खड्डेमय रस्ते आणि रखडलेल्या विकासकामांना कंटाळून आज धाराशिवच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. शहरातील आर. पी. कॉलेजसमोर झालेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनात शेकडो नागरिक, व्यापारी आणि विशेषतः शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनाने मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
“आक्रोश रस्त्यांचा, हक्क जनतेचा” अशा घोषणा देत आंदोलकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये शहरातून जाणाऱ्या बार्शी-बोरफळ राज्यमार्गाचे काम नुसतेच सुरू न करता, त्यात दोन्ही बाजूंना नाल्या, दुभाजक, फुटपाथ आणि दिवाबत्ती यांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. या कामाचा कार्यारंभ आदेश ९ ऑक्टोबर २०२४ रोजी मिळूनही काम सुरू न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यासोबतच, मंजूर झालेल्या राजमाता जिजाऊ चौक ते उंबरे कोटा रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे आणि १४० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या ५९ डीपी रस्त्यांची निविदा प्रक्रिया होऊनही रखडलेली कामे हाती घ्यावीत, असे आवाहन आंदोलकांनी केले. “यापूर्वी उपोषण करून आम्ही प्रशासनाला जागे केले होते, पण पुन्हा कामांना विलंब होत असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे,” असे आंदोलकांनी सांगितले. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे सिमेंट काँक्रीटने आणि पावसाने उघडीप दिल्यास डांबरीकरणाने तातडीने बुजवावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
प्रशासनाने दिले लेखी उत्तर
आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने लेखी उत्तरे देत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
- राज्य पायाभूत सुविधा महामंडळ: बार्शी-बोरफळ रस्त्यावर नाली, फुटपाथ, पथदिवे आणि दुभाजक या अतिरिक्त कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. त्याचे अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू असून, मान्यता मिळताच काम हाती घेण्यात येईल. तोपर्यंत कंत्राटदाराला रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत.
- नगर परिषद: जिजाऊ चौक ते उंबरे कोटा या रस्त्यावरील खड्डे पावसाची उघडीप मिळताच डांबरीकरण करून बुजवण्यात येतील, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे.
प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. आता या आश्वासनांची पूर्तता कधी होते, याकडे संपूर्ण धाराशिव शहराचे लक्ष लागले आहे.