धाराशिव – धाराशिव शहरात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा तलावात बुडून दुर्दवी मृत्यू झाला. आर्यन अनंत बीडकर असे या मुलाचे नाव आहे. क्रिकेट खेळायला आर्यन सांगून गेला होता पण तो परतलाच नाही. आर्यनचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
आर्यन हा धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता. रविवारी सुटी असल्याने तो पोहण्यासाठी गेला होता. आर्यनचे वडील अनंत बीडकर हे शहरातील खासगी दुकानात काम करतात तर आई गृहिणी आहे. दुपारी एक वाजता क्रिकेट खेळायला जातो म्हणून आर्यन घराबाहेर पडला. मात्र संध्याकाळ झाली तरी परतला नाही. आई-वडिलांनी शोध घेत मित्रांकडे चौकशी केली मात्र आर्यन सापडला नाही. रात्री उशिरा १० वाजेच्या सुमारास आनंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सोमवारी सकाळी शहरातील लेणी परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आर्यनचे कपडे दिसल्याने त्यांनी संशय व्यक्त करत आनंद नगर पोलिसांना कळवले.
पोलिस निरीक्षक हेमंत कदम, पो. हवालदार माने, आर्यनचे आई-वडिल घटनास्थळी पोहोचले. दगडावर काढून ठेवलेले कपडे, चप्पल आर्यन बीडकर याचीच असल्याची खात्री झाली. आर्यनचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.आनंद नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत श्वान पथकाला पाचारण केले. मात्र कोणताही संशयास्पद प्रकार नसल्याचे प्राथमिक माहितीत निष्पन्न झाले. घटनेमुळे घटनास्थळ लेणी परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.. सोमवारी सकाळी लेणी परिसरातील साठवण तलावाच्या भरावावर आर्यनचे कपडे नागरिकांना दिसून आले. पोलिस, पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह तलावात शोधकार्य सुरू केल्यावर तलावाच्या तळाशी आर्यनचा मृतदेह आढळला. त्यानंतर मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आर्यनचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला.