धाराशिव: शहरात दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या भागांतून दोन मोटरसायकली चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घरासमोर पार्क केलेल्या या दुचाकी अज्ञात चोरांनी लंपास केल्या असून, दोन्ही गुन्हे धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिल्या घटनेत, राजु सुधाकर घरत (वय ३० वर्षे, रा. जवाहरनगर, राजुरा, जि. चंद्रपुर, ह.मु. मारवाड गल्ली, धाराशिव) यांची २०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच ३४ डब्ल्यु १४८८) चोरीला गेली आहे. त्यांनी आपली मोटरसायकल ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारवाड गल्ली येथील घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पाहिले असता ती जागेवर नव्हती. त्यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, रियाज बाबुलाल सय्यद (वय ४४ वर्षे, रा. आदित्य पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, बार्शी रोड, धाराशिव) यांची सुमारे २०,००० रुपये किमतीची मोटरसायकल (क्र. एमएच २५ एस ३५२१) चोरी झाली. सय्यद यांनी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता त्यांची दुचाकी राहत्या घरासमोर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पाहणी केली असता, ती चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकाच दिवशी दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाल्याने, शहरात वाहनचोर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, त्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.