धाराशिव – शहरातील अस्वच्छता, खराब रस्ते, भटक्या जनावरांचा सुळसुळाट, विस्कळीत पाणीपुरवठा आणि बंद पथदिवे यांसारख्या अनेक नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने आज, मंगळवारी, नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नगर परिषद प्रशासन आणि राज्य सरकार नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसने शहरातील तब्बल १३ प्रमुख समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. शहरात सर्वत्र पसरलेली घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, रस्त्यांची चाळण झाली आहे, तर मोकाट कुत्रे, डुकरे आणि जनावरांमुळे महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. यासोबतच, अत्यंत धीम्या गतीने आणि निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले भुयारी गटार योजनेचे काम, उद्यानांची दुरवस्था, बाजारातील गैरसोय, कचरा डेपोची दुर्गंधी आणि भोगावती नदीच्या स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष यावरही काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे आणि जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शहरातील सर्व समस्यांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. आंदोलनात काँग्रेस नेते विश्वासराव शिंदे, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, माजी नगरसेवक आणि विविध विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजीने नगर परिषद परिसर दणाणून गेला होता.