धाराशिव – बांधकाम साहित्य पुरवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे, मुंबई आणि आळंदी येथील तीन व्यापाऱ्यांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी दिलीप दादासाहेब साळुंके (वय ५०, रा. हरिश्चंद्र नगर, जुना उपळा रोड, धाराशिव) यांना आरोपी जन्नु ओस्वाल (रा. टिंबर मार्केट पुणे), वेलकम ट्रेडर्सचे मालक विक्र शंकरलाल जाजोट (रा. मुंबई) आणि आशा पुरा स्टील ट्रेडर्स आळंदी पुणे यांचे मालक मांगीलाल सुनाजी पुरोहित यांनी संगनमत करून गाठले. त्यांनी साळुंके यांना बांधकामासाठी लागणारे स्टील आणि सिमेंट पुरवण्याचे आमिष दाखवले.
५ मार्च २०२४ ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आरोपींनी साळुंके यांच्याकडून बांधकाम साहित्यापोटी २ कोटी २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे स्वीकारले. ही रक्कम उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या उल्हासनगर येथील शाखेच्या एका खात्यावर वर्ग करण्यात आली होती.मात्र, ठरल्याप्रमाणे बांधकाम साहित्य न पुरवता आणि घेतलेली रक्कमही परत न करता आरोपींनी फिर्यादी दिलीप साळुंके यांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलीप साळुंके यांनी १९ एप्रिल २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात) आणि ३४ (समान उद्देशाने केलेले कृत्य) अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.