धाराशिव: वाहनात पाणी मिश्रित इंधन (डिझेल) भरल्यामुळे इंजिनमध्ये बिघाड झाल्याप्रकरणी धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात ग्राहकाच्या सेवेत त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत, आयोगाने धाराशिव (उस्मानाबाद) पोलीस पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला ग्राहकास सुमारे दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
धाराशिव येथील वकील मुकुंद बाळासाहेब माढेकर यांनी ही तक्रार दाखल केली होती. माढेकर यांनी २३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री उस्मानाबाद पोलीस पेट्रोल पंपावरून आपल्या चारचाकी वाहनात (एम.एच.२५/ए.एल. ४१५८) ५०० रुपयांचे डिझेल भरले होते. पेट्रोल पंपावरून काही अंतरावर गेल्यावर त्यांचे वाहन अचानक बंद पडले.
वाहनाची तपासणी केली असता, इंधनाच्या टाकीमध्ये पाणी मिश्रित इंधन गेल्यामुळे इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे अधिकृत सर्व्हिस सेंटरने (चव्हाण मोटर्स) स्पष्ट केले. या बिघाडामुळे वाहन टो करून गॅरेजला न्यावे लागले आणि दुरुस्तीसाठी मोठा खर्च आला. याबाबत माढेकर यांनी पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता, त्यांनी दाद दिली नाही. अखेर माढेकर यांनी जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
पेट्रोल पंप व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळले होते. तक्रारदार खोटे बोलत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर ग्राहकांच्या तक्रारी नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, तक्रारदाराने सादर केलेले अधिकृत गॅरेजचे ‘जॉब कार्ड’ आणि दुरुस्ती अहवाल आयोगाने ग्राह्य धरला. यामध्ये “Water in fuel tank” (इंधनाच्या टाकीत पाणी) असा स्पष्ट उल्लेख होत.
आयोगाचा आदेश
जिल्हा आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा हेंद्रे आणि सदस्य श्रीमती वैशाली बोराडे यांनी हा निकाल दिला. आयोगाने स्पष्ट केले की, पेट्रोल पंपाने सदोष सेवा दिली असून त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आयोगाने पेट्रोल पंप व्यवस्थापक आणि भारत पेट्रोलियम यांना खालीलप्रमाणे रक्कम ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत:
-
वाहनाच्या दुरुस्तीचा आणि वाहतुकीचा खर्च: १,३१,८९६ रुपये.
-
आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी: १०,००० रुपये.
-
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी: ८,००० रुपये.
या निकालामुळे पेट्रोल पंप चालकांकडून होणाऱ्या इंधन भेसळीला चाप बसणार असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






