साहेबांचं वक्तव्य आलं आणि धाराशिवच्या मातीत खसखस पिकायला लागली! “मी कुणाचा एक रुपयाही खात नाही आणि खाऊ देत नाही!” असं सोलापूरला बदली झाल्यावर ते ठासून सांगू लागले. पण आम्हीही विचारलं – “अहो, मग धाराशिवमध्ये तोंड कोणाच्या खिस्यात होतं?”
हा प्रकार अगदी तसाच जसा – कुत्र्याला ४० दिवस पांघरूण घातलं तरी तो शेपूट वाकडीच! भ्रष्टाचाराच्या उचापती, लायसन वाटपाची मेहेरबानी, अनधिकृत पदभार, गुन्हेगारांची पाठराखण आणि ज्यांनी कळप उघड केला त्यांना निलंबनाची शिक्षा – हे सगळं झाल्यावर साहेब आता जाहीरपणे “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” म्हणतात!
धाराशिवच्या मातीत ‘भ्रष्टाचाराचा’ सेंद्रिय खत पुरवणारे साहेब
धाराशिवमध्ये असताना असा धिंगाणा घातला की भ्रष्ट अधिकाऱ्यांची टूम निघाली!
- गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती
- तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचे लेखी अहवाल येऊनही त्यांना संरक्षण
- निवडणुकीच्या चौकशीखाली असलेल्यांना ‘विशेष’ जबाबदारी
- जो भ्रष्टाचार बाहेर काढतो त्याला मात्र निलंबनाचा प्रसाद!
साहेबांनी धाराशिवमध्ये ‘लोकशाही’ला माती खायला लावली आणि सोलापूरला जाऊन धार्मिक प्रवचनं सुरू केली! “सौ चूहे खाके बिल्ली चली हज को” असं म्हणायचं, पण हे इथं अगदी “शंभर कोटींचा घोटाळा खाऊन साहेब पुजेला गेले!” असं झालं.
सहिष्णुता कुठं गेली? बायकोचा भाऊ पैसे गोळा करत होता!
धाराशिवमध्ये साहेबांच्या नावाने उघड पंगत बसलेली होती. चहापेक्षा तपेली जास्त गरम! त्यात बायकोचा भाऊ पैसे गोळा करत होता. तेव्हा साहेब चक्क “धृतराष्ट्र मोड” वर गेले. म्हणजे त्यांच्या पुढ्यात चोरी सुरू असली तरी डोळे मिटून बसायचं! पण आता मात्र “सज्जन माणसाचा” आव आणतायत.
साहेबांना एक विनंती – अजून थोडं एक्टिंग शिका!
सोलापूरला गेल्यावर या नाटकाला टाळ्या मिळतील का नाही, माहित नाही, पण धाराशिवमध्ये मात्र “साहेब, तुम्ही जबरदस्त विनोदी कलाकार आहात!” असं म्हणावं लागेल. “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” हे वाक्य म्हणायच्या आधी, आपण किती अन्नपूर्णा होतो, हे तरी बघायचं ना!
सोलापूरच्या जनता सावध राहा! नाहीतर पुढच्या वेळी “गुन्हेगारांना गोंजारणारा भ्रष्टाचाराचा महामेरू” तुम्हाला “सत्याचा प्रचारक” म्हणून समोर येईल आणि मग… काही बोलायलाच जागा राहणार नाही!
- बोरूबहाद्दर