धाराशिव – तुळजापूर येथील गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात अटकेतील तीन आरोपी आणि एका फरार आरोपीचा जामीन अर्ज धाराशिव जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी मॅडम यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
न्यायालयाने अटकेत असलेल्या संगिता वैभव गोळे (वय ३२, रा. मुंबई), संतोष अशोक खोत (वय ४९, रा. मुंबई), आणि युवराज देवीदास दळवी (वय ३८, रा. तुळजापूर) यांचा नियमित जामीन अर्ज नामंजूर केला. यासोबतच, याच प्रकरणातील फरार आरोपी आणि संगिता गोळे हिचा पती वैभव अरविंद गोळे (रा. मुंबई) याचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
दरम्यान, याच प्रकरणातील अन्य तीन आरोपी – संकेत अनिल शिंदे (वय २३, रा. तुळजापूर) आणि संदीप संजय राठोड (वय २२, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर) , अमित अरगडे यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. या तीन अर्जांवर ८ मे २०२५ रोजी निकाल दिला जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक करून त्यांच्याकडून ४५ ग्रॅम वजनाच्या, २.५ लाख रुपये किमतीच्या एमडी ड्रग्जच्या ५९ पुड्या, गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन आणि मोबाईल असा एकूण १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. प्रयोगशाळा तपासणीत जप्त केलेला पदार्थ हा एमडी ड्रग्जच असल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यामुळे आरोपींवरील गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे.
तपासाची सद्यस्थिती
या प्रकरणाचा तपास वाढत जाऊन आरोपींची संख्या ३६ वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी केवळ १४ आरोपींनाच अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, तब्बल २२ आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणात १० हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असले तरी, मोठ्या संख्येने आरोपी फरार असल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वीही फरार आरोपींपैकी स्वराज्य उर्फ पिनू तेलंग आणि इंद्रजित उर्फ मिठू ठाकूर यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. आता पुन्हा चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ८ मे रोजी येणाऱ्या तीन आरोपींवरील न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.