धाराशिव: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धाराशिव जिल्हा न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी आणि ४१,५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ओंकार तानाजी काळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल विशेष सत्र न्यायाधीश श्री. अवटे यांनी दिला.
फिर्यादीची पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी ओंकार काळे सतत तिचा पाठलाग करून तिला जीवे मारण्याची धमकी देत असे. याबाबत मुलीच्या पालकांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या वडिलांना बोलावून समज दिली होती. आरोपीच्या वडिलांनी मुलगा पुन्हा त्रास देणार नाही, अशी खात्री दिल्यानंतर मुलीला पुढील शिक्षणासाठी सोलापूर येथे ठेवण्यात आले होते.
मात्र, दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी पीडित मुलगी सोलापूर येथील कॉलेजला गेली असता, आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. त्याने तिला पनवेल आणि मुंबई येथे नेऊन जीवे मारण्याची धमकी देत, तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३६३, ३५४, ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा (क्रमांक ३९१/२०२३) दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. गोरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक श्रीमती प्रांजली बाबासाहेब साठे यांनी काम पाहिले.






