धाराशिव: वरवंटी (ता. जि. धाराशिव) येथे एका विवाहित महिलेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मंगेश महादेव बेंद्रे उर्फ मुंगळया असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा निकाल ३१ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आला.
नेमकी घटना काय?
प्रकरणाची हकीकत अशी की, १९ एप्रिल २०२१ रोजी रात्री २:३० च्या सुमारास पीडिता घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपी मंगेश बेंद्रे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याच वेळी पीडितेचे पती घरी आले असता, त्यांना पाहून आरोपीने तिथून पलायन केले. मात्र, या घटनेनंतरही आरोपीने पीडितेचा पाठलाग करून तिला त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर पीडितेने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन ‘पिंक पथकाचे’ पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत द. आनंदे यांनी केल7. खटल्याची सुनावणी धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ ए. एस. आवटे यांच्या न्यायालयात झाली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. जयंत व्ही. देशमुख यांनी जोरदार युक्तिवाद केला. या खटल्यामध्ये पीडिता आणि तिच्या पतीची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून आरोपी मंगेश बेंद्रे याला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
-
भा.द.वि. कलम ३७६: १० वर्षे सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड.
-
भा.द.वि. कलम ३२३: १ महिना सश्रम कारावास.
ही शिक्षा ३१ डिसेंबर २०२५ रोजी ठोठावण्यात आली आहे.






