धाराशिव: शहरातून कत्तलीच्या उद्देशाने पिकअप ट्रकमधून निर्दयतेने होणारी गोवंश वाहतूक रोखण्यात धाराशिव शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तीन जर्सी गायींची सुटका केली असून, सोलापूर जिल्ह्यातील एका चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धाराशिव शहर पोलीस शुक्रवारी, ४ जुलै २०२५ रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास धाराशिव-वैराग रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी आयान कुरेशी यांच्या शेळी पालन फार्मजवळ त्यांना एक संशयास्पद पिकअप ट्रक (क्र. एमएच १३ डीक्यू ६९३०) दिसला. पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली असता, त्यात तीन जर्सी गायींना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयतेने कोंबून बसवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव मुन्ना उर्फ बालारफी निसार मुलानी (वय २६, रा. पुळुज, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे सांगितले. तो या गायींना कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांनी तात्काळ १,३०,००० रुपये किमतीच्या या तीन गायींची सुटका करून वाहन जप्त केले. याप्रकरणी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देत, मुन्ना मुलानी विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेल्या गायींना गोशाळेत पाठवण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.