धाराशिव – शहरातील वैराग नाका परिसरात कत्तलीच्या उद्देशाने चार जर्सी गायींची पिकअपमधून निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघा जणांवर धाराशिव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या गायींची सुटका करण्यात आली आहे.
अन्सार करीम कुरेशी (वय ३१, रा. ढोकी, ता. जि. धाराशिव) आणि जावेद कुरेशी (रा. खिरणीमळा, धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, १० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वैराग नाका येथे पोलिसांचे पथक गस्तीवर होते. यावेळी त्यांना एमएच ०८ डब्ल्यू ३११६ या क्रमांकाच्या पिकअप वाहनावर संशय आला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये चार जर्सी गायी अत्यंत निर्दयतेने कोंबलेल्या स्थितीत आढळून आल्या. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय वाहनात करण्यात आली नव्हती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, आरोपी हे एकूण १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या या गायींना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गायींची सुटका केली.
याप्रकरणी, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमातील संबंधित कलमांन्वये (कलम ५(अ)(१) आणि कलम ११(१)(ब)) अन्सार कुरेशी व जावेद कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.
नळदुर्ग: कत्तलीसाठी पायी गाय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, पोलिसांची कारवाई
कत्तलीच्या उद्देशाने एका गायीला पायी चालवत निर्दयतेने घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर नळदुर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, २५ हजार रुपये किमतीच्या गायीची सुटका केली आहे.युनुस ताजोद्दीन शेख (वय ३५, रा. रहीमनगर, नळदुर्ग) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी, १० जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांचे पथक गुजनूर ते नळदुर्ग रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी त्यांना उजणी टी-पॉईंट जवळच्या वानदगाव शेतशिवारातून आरोपी युनुस शेख हा एका गायीला पायी घेऊन जात असल्याचे दिसले.
त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. चौकशीदरम्यान, तो या गायीला कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे उघड झाले. तसेच, त्याने गायीसाठी चारा-पाण्याची कोणतीही सोय केली नव्हती व तिला निर्दयतेने हाताळत होता.
यानंतर, पोलिसांनी तात्काळ २५,००० रुपये किमतीची गाय ताब्यात घेऊन आरोपी युनुस शेख याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(अ) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात बेकायदा गोवंश वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.