धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शहरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे, तर ग्रामीण भागात बकरी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. एका प्रकरणात नागरिकांच्या सतर्कतेमुळे बकरी चोरांना रंगेहाथ पकडण्यात यश आले आहे, तर दुसऱ्या घटनेत चोर पसार झाले आहेत. याप्रकरणी धाराशिव शहर आणि कळंब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धाराशिवमध्ये भरदिवसा घरफोडी, ९५ हजारांचा ऐवज लंपास
धाराशिव शहरातील शम्सपुरा दर्गा रोड परिसरात राहणाऱ्या शबनम मिनाज शेख (वय ३५) यांच्या बंद घराला चोरांनी लक्ष्य केले. दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ३ च्या सुमारास अज्ञात चोराने त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील किचनमध्ये एका पिशवीत ठेवलेले १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सुमारे ९५,००० रुपये आहे, चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी शबनम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बकरी चोरांना रंगेहाथ पकडले, तिघांना अटक
धाराशिव तालुक्यातील राघुचीवाडी शिवारात बकरी चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. सुरेश अभिमान करवर (वय ४२) यांच्या शेतातील शेडमधून तीन बकऱ्या चोरीला जात असताना हा प्रकार उघडकीस आला. ८ सप्टेंबर रोजी रात्री ११:४० च्या सुमारास आरोपी आरिफ दिलावर शेख (वय २५, रा. टिपु सुलतान चौक, धाराशिव), सुरज शेख आणि नुमान मोमीन (दोघेही रा. फकीरा नगर, धाराशिव) हे अंदाजे ३८,००० रुपये किमतीच्या तीन बकऱ्या चोरून नेत होते. यावेळी फिर्यादी सुरेश करवर आणि इतर नागरिकांनी आरोपी आरिफ शेख याला रंगेहाथ पकडले.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरज शेख आणि नुमान मोमीन यांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
कळंबमध्ये शेड कापून शेळ्या-बोकड चोरले
कळंब तालुक्यातील डिकसळ शिवारातही बकरी चोरीची घटना घडली आहे. धर्मराज मनोहर आंबीकर (वय ४९) यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडचा मागील पत्रा कापून चोरांनी आत प्रवेश केला. चोरांनी त्यांची एक शेळी, एक बोकड आणि त्याच शेडमधील दत्तात्रय तनपुरे यांची एक शेळी असा एकूण १५,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ६ आणि ७ सप्टेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी धर्मराज आंबीकर यांच्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.