धाराशिव – धाराशिव शहरातील टी.पी.एस. कॉर्नर परिसरातून एका १६ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश शंकर मोरे (वय ४१, मूळ रा. सांगवी बु., ता. अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या रा. टी.पी.एस. कॉर्नर, धाराशिव) यांचा मुलगा आदित्य गणेश मोरे (वय १६) हा त्यांच्यासोबत धाराशिव येथे वास्तव्यास होता.
दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास टी.पी.एस. कॉर्नर परिसरातून आदित्य याला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले. मुलाचा शोध घेऊनही तो मिळून न आल्याने गणेश मोरे यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी गणेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.







