धाराशिव: जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वाशी तालुक्यात तब्बल ५ लाख रुपयांच्या विद्युत तारांची चोरी झाली आहे, तर तुळजापूर, नळदुर्ग आणि तामलवाडी परिसरात चोरट्यांनी दुचाकी, सोन्याचे दागिने आणि चक्क म्हशी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
१. वाशी: कंपनीच्या ५ लाखांच्या तारांची चोरी (वाशी पोलीस ठाणे)
दहीफळ शिवारातील सेरेटिका रिन्युएबलस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या साईटवरून मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनीयमच्या तारांची चोरी झाली आहे. दि. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते ३ च्या सुमारास चोरट्यांनी फॉरेस्टमधील पाणी तलावाकडून खरे वस्तीकडे जाणाऱ्या पॅन्थर लाईनच्या १२ पोलवरील ३३ केव्ही एस.पी.एस.सी. ॲल्युमिनीयमच्या तारा कापून नेल्या. सुमारे ६०० मीटर लांबीच्या या तारांची किंमत अंदाजे ५,००,००० रुपये आहे. याप्रकरणी सेलवा दिनेश मुथू (रा. तामिळनाडू, ह.मु. सरमकुंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. पशुधन चोरांचा धुमाकूळ: दीड लाखांचे पशुधन लंपास
-
तामलवाडी: नांदुरी (ता. तुळजापूर) येथील विकास अरविंद मुळुक यांच्या शेतातील गोठ्यातून दोन म्हैस व एक रेडकू असे एकूण ९०,००० रुपयांचे पशुधन चोरट्यांनी दि. १६ डिसेंबरच्या रात्री चोरून नेले. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-
नळदुर्ग: इंदीरानगर तांडा (हंगरगा) येथील चंदुलाल धनसिंग चव्हाण यांची ६०,००० रुपये किमतीची मुऱ्हा जातीची म्हैस लोहगाव-नंदगाव शिवारातून चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
३. तुळजापूर बसस्थानकावर महिलेचे दागिने चोरीला
तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेचे दागिने लंपास केले. किरण मनोज मोहळकर (रा. पंढरपूर) या दि. १६ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बसमध्ये चढत असताना, चोरट्याने त्यांच्या पर्समधील ५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २० हजार रोख असा एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
४. दुचाकी चोरीच्या दोन घटना
-
तुळजापूर: सिंदफळ येथील शुभम फत्तेसिंग कापसे यांची २५,००० रुपये किमतीची टीव्हीएस व्हीक्टर दुचाकी (MH 25 AF 8232) घरासमोरून चोरीला गेली.
-
कळंब: नायगाव येथील ७० वर्षीय वृद्ध बसलिंग उर्फ बसवेश्वर मेनकुदळे यांची २०,००० रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स दुचाकी (MH 25 Z 2650) कळंबमधील जय भवानी फंक्शन हॉलसमोरून चोरीला गेली.
वरिल सर्व गुन्ह्यांत संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






