धाराशिव: शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. कुटुंबिय लग्नासाठी किंवा बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी हे कृत्य केले आहे. याप्रकरणी धाराशिव शहर आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटना १: लग्नाला जाणे पडले महागात (कुरणेनगर)
पहिली घटना कुरणेनगर भागात घडली. फिर्यादी शुध्दोधन अशोक गायकवाड (वय २७) आणि त्यांचे कुटुंबीय लातूर येथे एका लग्नासाठी गेले होते. ही संधी साधत दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ११:३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाच्या मोकळ्या फटीतून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील १३ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ९६,००० रुपये रोख असा एकूण १,६५,५१३ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शुध्दोधन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटना २: बाहेरगावी गेलेल्या वृद्धाचे घर फोडले (समर्थ नगर)
दुसऱ्या घटनेत, समर्थ नगर (वरुडा रोड) येथील रहिवासी दिपक शिवाजी शेरखाने (वय ६३) हे आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी येथे गेले होते. त्यांचे घर दि. ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत बंद होते. यादरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील १७ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि १०,००० रुपये रोख असा एकूण ६१,७७० रुपयांचा ऐवज लांबवला. शेरखाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






