धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे तब्बल ७ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्यासह, दुचाकी, शेतकऱ्यांची जनावरे आणि विद्युत साहित्याच्या चोरीचा समावेश आहे. या घटनांमध्ये एकूण ३ लाख २५ हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
याबाबत पोलीस ठानिहाय सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे:
१. महिलांच्या दागिन्यांवर डल्ला (वाशी, कळंब आणि धाराशिव)
-
वाशी: गोलेगाव (ता. वाशी) येथे ३० डिसेंबरच्या रात्री १०:३० वाजता कल्पना कालीदास कागदे (३८) या पायी घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
-
कळंब: बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका तरुणीचे दागिने लांबवले. अनुराधा प्रविण माळी (१९, रा. चिंचोली, बीड) या ३० डिसेंबर रोजी सकाळी ११:४२ वाजता कळंब बसस्थानकात बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले.
-
धाराशिव (आनंदनगर): धाराशिव बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर २९ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता कविता बाळासाहेब नवले (४९, रा. समर्थनगर) यांच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण एका अज्ञात चोरट्याने चोरले आणि तो गाडीवर बसून पळून गेला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२. दुचाकी आणि जनावरांची चोरी (कळंब आणि बेंबळी)
-
कळंब: येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे लावलेली मनोज श्रीहरी गुंड यांची २८ हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी (MH 25 AB 8599) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २६ डिसेंबर रोजी घडली होती.
-
बेंबळी (दारफळ): दारफळ (ता. धाराशिव) येथील अमोल दिनकर देशपांडे यांच्या शेतातील गोठ्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ३ म्हशी चोरून नेल्या. ७ व ८ डिसेंबरच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत शेतकऱ्याचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
३. विद्युत वाहिनी आणि इंडस्ट्रियल साहित्याची चोरी (नळदुर्ग आणि बेंबळी)
-
नळदुर्ग: चिकुंद्रा-किलज रोडवर विद्युत खांबावरील ४० हजार रुपये किमतीची ॲल्युमिनीयमची तार (पॅन्थर कंडक्टर) अज्ञात चोरट्यांनी कापून नेली. याबाबत रावसाहेब शेंडे यांनी फिर्याद दिली आहे.
-
बेंबळी (केशेगाव): केशेगाव शिवारातील सेरेंटीका रिन्युअल्स इंडिया ५ प्रा. लि. कंपनीच्या साईटवरून ५० हजार रुपये किमतीचे कॉपर केबल, एलईडी लाईट्स आणि स्विचेस असा माल चोरीला गेला. १० ते ११ डिसेंबर दरम्यान ही चोरी झाली असून प्रद्युम्नकुमार नायक यांनी फिर्याद दिली आहे.
वरिल सर्व गुन्ह्यांची नोंद ३१ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.







