धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरफोडी, वाहन चोरी आणि शेतकऱ्यांच्या पशुधनावर डल्ला मारण्यासोबतच आता चोरांनी शासकीय आणि खाजगी प्रकल्पांमधील महागड्या विद्युत तारांना लक्ष्य केले आहे. बेंबळी, तुळजापूर, कळंब, उमरगा आणि वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाशी: विद्युत प्रकल्पांवर चोरांची वक्रदृष्टी, लाखांचा मुद्देमाल चोरीला
वाशी तालुक्यात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत साहित्यावर डल्ला मारला आहे.
-
घटना १: निपाणी (डिघोळ फाटा) येथील सोलार पॉवर कंपनीच्या प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी १,५५६ मीटर कॉपर केबल, फिमेल आणि मेल केबल असा एकूण ८७,६२४ रुपयांचा मुद्देमाल चोरला. ही घटना ११ नोव्हेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी संतोष नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे.
-
घटना २: येसवंडी शिवारातील ३३ केव्ही सबस्टेशनमधून तब्बल २ लाख ६१ हजार ८५६ रुपये किमतीची ॲल्युमिनियमची विद्युत तार (अंदाजे १ किमी लांबीची) चोरीला गेली आहे. याप्रकरणी सुभाष तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
उमरगा: पत्र्याचे शेड कापून शेळ्या-बोकडांची चोरी
उमरगा तालुक्यातील मुळज येथे शेतकऱ्याच्या पशुधनावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत राठोड यांच्या पत्र्याच्या शेडचा मागील पत्रा कापून चोरट्यांनी एक शेळी आणि सात बोकड असा एकूण ९८,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १६ नोव्हेंबरच्या रात्री घडली असून, उमरगा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बेंबळी: भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास
बरमगाव बु. शिवार (ता. जि. धाराशिव) येथे रामेश्वर गव्हाणे यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४:३० च्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी घरातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ३२,२८९ रुपये) चोरून नेले. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब आणि तुळजापुरातही चोऱ्या
-
कळंब: भोगजी शिवारात अनंता जाधवर यांच्या शेतातील गोठ्यावरून ५०० फूट वायर, एसटीबी फवारा आणि दोन कटर असा १०,००० रुपयांचा शेतीोपयोगी माल चोरीला गेला आहे.
-
तुळजापूर: देवसिंगा (तुळ) पाटी येथून चंद्रकांत जाधव यांची ३५,००० रुपये किमतीची टीव्हीएस मोटारसायकल (क्र. एमएच २५ एक्यू १११४) चोरट्यांनी पळवून नेली.
जिल्ह्यात एकाच वेळी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.







