धाराशिव: जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, एकाच दिवशी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. येरमाळा, उमरगा, नळदुर्ग आणि बेंबळी येथे घरफोडी, वाहन चोरी आणि इतर साहित्य मिळून अज्ञात चोरट्यांनी एकूण ३ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पानगावमध्ये भरवस्तीत घरफोडी
पानगाव (ता. कळंब) येथील रहिवासी दत्तात्रय मारुती ठोंबरे (वय ५५) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. ही घटना १४ जानेवारीच्या रात्री ९ ते १५ जानेवारीच्या सकाळी १०:३० च्या दरम्यान घडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १७ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग येथून तीन मोटारसायकलींची चोरी:
नळदुर्ग येथील जुन्या खंडोबा मंदिराजवळ (मैलापूर) पार्क केलेल्या तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवल्या. विजय प्रभाकर सुरवसे (रा. चिंचोली, ता. उमरगा) यांच्या फिर्यादीनुसार, ३ जानेवारी रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान त्यांची व त्यांच्या मित्रांची (सुनील सालेगाव आणि म्हाळप्पा सूर्यवंशी) अशा तीन मोटारसायकली चोरीला गेल्या. यामध्ये ४० हजारांची होंडा युनिकॉर्न, २५ हजारांची हिरो स्प्लेंडर आणि ३० हजारांची होंडा शाईन असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबत १५ जानेवारी रोजी नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.
केशेगावात सोलर कंपनीच्या वायरची चोरी
बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केशेगाव शिवारामधून पुरुषोत्तम सोलार कंपनीच्या साहित्याची चोरी झाली आहे. कंपनीचे एरिया मॅनेजर संदीप शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ ते २ जानेवारी दरम्यान अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या शेत गट नं. ४४९ व ४५० मधून १२०० मीटर लांबीची पॉलीकॅब वायर चोरून नेली. चोरीला गेलेल्या वायरची किंमत अंदाजे ६४ हजार रुपये आहे.
नारंगवाडीत धाब्यावर चोरी
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे एका धाब्याचे पत्र्याचे शेड कापून चोरी केल्याची घटना घडली. शंकर दामू मुगळे (वय ४०) यांच्या धाब्यावर १४ जानेवारीच्या रात्री ही चोरी झाली. चोरट्यांनी तांदळाचा कट्टा, तेलाचा डबा आणि बकरे असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच वेळी जिल्ह्याच्या विविध भागांत घडलेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.






