उमरगा : शहरातील कानडे हॉस्पिटलसमोर लावलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ७) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औराद (ता. उमरगा) येथील अमोल व्यंकट गायकवाड (वय ३५) हे ४ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उमरगा येथील कानडे हॉस्पिटल येथे आले होते. त्यांनी आपली हिरो कंपनीची (एमएच २५ ए.एन. ००६८) दुचाकी रुग्णालयासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. आजूबाजूला शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने अखेर अमोल गायकवाड यांनी मंगळवारी (दि. ७) पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनचक्कीच्या सव्वा लाखांच्या तारांची चोरी
वाशी : तांदूळवाडी (ता. वाशी) शिवारातील पवनचक्कीच्या ई.एच.व्ही. (EHV) इलेक्ट्रिक लाईनच्या १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारा तोडून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी ५ अज्ञात व्यक्तींवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी रात्री साडेसात ते अकरा वाजेच्या सुमारास तांदूळवाडी शिवारात भागवत शिवाजी भोसले यांच्या शेतामध्ये ही चोरी झाली. येथे सेरेंटिका रिन्युएबल इंडिया प्रा.लि. कंपनीचे पवनचक्कीचे काम सुरू आहे. ५ अज्ञात चोरट्यांनी या पवनचक्कीच्या इलेक्ट्रिक लाईनच्या ५९० एमएम जाडीच्या ॲल्युमिनियमच्या तारा तोडून नुकसान केले. त्यानंतर अशोक लेलँड कंपनीच्या ‘छोटा हत्ती’ (एमएच ४४ यु ०२४६) या वाहनामध्ये तारा भरून त्या चोरून नेल्या. यात कंपनीचे तब्बल १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी समर्थ दिनकर माने (वय २३, मूळ रा. विजापूर रोड, सोलापूर, ह.मु. द्वारका नगर, कळंब) यांनी मंगळवारी (दि. ७) दिलेल्या प्रथम खबरीवरून वाशी पोलीस ठाण्यात ५ अज्ञात व्यक्तींवर भा.न्या.सं. कलम ३०३(२), ६२, ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







