धाराशिव: जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, उमरगा, तुळजापूर, धाराशिव आणि कळंब तालुक्यात विविध ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. यामध्ये बंद घर फोडून सोन्याचे दागिने, घरासमोरून जीप, मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या, भक्त निवासातून मोबाईल आणि रोख रक्कम, तर शेतकऱ्याच्या शेळ्या-मेंढ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरग्यात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला
उमरगा शहरातील नृयु बालाजी नगर येथील रहिवासी प्रतिक बळीराम वडदरे (वय २८) हे आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्याने दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत अंदाजे २,७१,६५० रुपये आहे, चोरून नेले. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या आणि केबलवर डल्ला
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील जिवो कंपनीच्या टॉवरच्या ५ बॅटऱ्या, १५ मीटर सोलार केबल आणि जहागीरदारवाडी जवळील कॉस्लाईट कंपनीच्या ३ बॅटऱ्या व ८० मीटर आरआरएच केबल असा एकूण ४३,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना ८ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान घडली. याप्रकरणी प्रशांत सतिश घुले (वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घरासमोरून ७० हजारांची टाटा सुमो जीप पळवली
धाराशिव शहरातील शिंगोली एमआयडीसी समोर, शालीमार कॉलनी येथे राहणारे कबाल गुलाम दस्तगीर अन्सारी (वय ६५) यांची पांढऱ्या रंगाची टाटा सुमो जीप (क्र. एमएच २५ क्यु ०१५०) दि. ८ ऑक्टोबरच्या रात्री ९ ते ९ ऑक्टोबरच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरासमोरून चोरीला गेली. या जीपची अंदाजे किंमत ७०,००० रुपये आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
तुळजापुरात भक्त निवासातून भाविकाचे साडेपासष्ट हजार लंपास
पुणे येथील रहिवासी अजित हनमंत काटकर (वय ४१) हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. दि. १४ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता ते तुळजाभवानी भक्त निवास १०८ मधील रूम नंबर जी-१९ मध्ये थांबले असताना, अज्ञात व्यक्तीने काचेच्या खिडकीतून आत हात घालून त्यांच्या बॅगेतील ५,००० रुपये रोख, बोट कंपनीचा हेडफोन आणि एक मोबाईल फोन असा एकूण ६५,७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्याच्या ८ शेळ्या-मेंढ्यांची चोरी
कळंब तालुक्यातील रत्नापूर येथील शेतकरी सुशिलकुमार अच्युतराव जाधवर (वय ५१) यांच्या रत्नापूर शिवारातील गट नं. ३५० मधील शेतातून अज्ञात चोरट्याने ५ शेळ्या, २ बोकड आणि १ पाट असा एकूण ७७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १४ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान घडली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.