धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या आणि सशस्त्र दरोड्याच्या घटनांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून, अवघ्या चोवीस तासांत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारीच्या चार मोठ्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये भुम तालुक्यातील सोनगिरी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वातीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. तर दुसरीकडे, कळंब, बेंबळी आणि येरमाळा परिसरातही चोऱ्या आणि सशस्त्र दरोड्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनगिरीत बंद घरातून सव्वातीन लाखांचे सोने चोरीला
भुम तालुक्यातील सोनगिरी येथे राहणारे ७० वर्षीय वृद्ध प्रभु भुजंग गणगे यांच्या घरात मोठी चोरी झाली. दिनांक १७ ऑगस्टच्या रात्री ११ ते १८ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खोलीचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत ३,१५,००० रुपये आहे, चोरून नेले. याप्रकरणी प्रभु गणगे यांनी भुम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून दुकानात घुसून सशस्त्र दरोडा
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, कळंब तालुक्यातील चोराखळी येथे एका जुन्या घटनेप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे. २२ जुलै २०१८ रोजी गणेश राजकुमार वंजारे (वय २३) यांच्या दुकानावर सुशील खंडागळे, वैभव खंडागale, सचिन शिंदे आणि रामा शिंदे या चार आरोपींनी दारू पिऊन हल्ला केला होता. दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि नकार देताच वंजारे यांना धकलून देऊन ड्रॉवरमधील १८,०५० रुपये जबरदस्तीने काढून नेले. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे मामा आणि आई यांना शिवीगाळ व मारहाण करून घराचे नुकसान केले व “तुमचा काटा काढतो” अशी धमकी दिली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर येरमाळा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३९४, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
शेतकरी पुन्हा हैराण, कळंबमध्ये ६० हजारांच्या पानबुड्या चोरीला
कळंब तालुक्यातील हावरगाव शिवारात पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. प्रमोद शहाजी मुळीक (वय २८) आणि इतर तीन शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण ६०,००० रुपये किमतीच्या चार पानबुड्या (सबमर्सिबल पंप) आणि केबल चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना १७ ऑगस्टच्या रात्री ९ ते १८ ऑगस्टच्या दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरासमोरून सव्वा लाखांची युनिकॉर्न मोटरसायकल लंपास
बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारी येथून एक महागडी मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. लोहारा येथील स्वप्निल शरणय्या स्वामी (वय २५) यांची १,३०,००० रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न (क्र. एमएच २५ बीडी ४५८६) मोटरसायकल नितीन पाटील यांच्या घरासमोरून दि. ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.