धाराशिव: तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकाला नैसर्गिक विधीसाठी रस्त्याच्या कडेला थांबणे चांगलेच महागात पडले आहे. गाडीचा दरवाजा उघडा ठेवून ते गेले असता, अज्ञात चोरट्यांनी गाडीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी बावी पाटीजवळ घडली.
याप्रकरणी अशोक अर्जुन खरात (वय ५१, रा. विजापूर, ह.मु. गुलबर्गा) यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हे आपल्या टाटा नेक्सॉन गाडीने (क्र. केए २८ एमए २००६) गुलबर्गा येथून तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात होते. १३ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ते धाराशिव तालुक्यातील बावी आश्रम शाळेच्या पुलापुढे पोहोचले.
नैसर्गिक विधीसाठी ते गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवून खाली उतरले. मात्र, त्यांनी गाडीचा दरवाजा उघडाच ठेवला. हीच संधी साधून तीन अज्ञात व्यक्तींनी गाडीत ठेवलेले ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन चोरून नेला.
याप्रकरणी अशोक खरात यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
तुळजापुरात गर्दीचा फायदा घेत दागिने पळवले
केज (जि. बीड) येथील रहिवासी पल्लवी दत्तू अंधारे (वय ३०) या मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. होमाजवळ दर्शनासाठी रांगेत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे, सुमारे ६०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पल्लवी अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आठवडी बाजारातून मोटारसायकल चोरी
दुसऱ्या घटनेत, धाराशिव शहरातील रामनगर, सांजा चौक येथील रहिवासी संतोष भगवान कांबळे (वय ४०) यांची हिरो होंडा फॅशन मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए ७११६) चोरीला गेली आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते पावणेसातच्या सुमारास त्यांनी आपली ३०,००० रुपये किमतीची मोटारसायकल आठवडा बाजारातील सब-स्टेशन बिल्डिंगसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.