धाराशिव: टेलिग्राम ॲपद्वारे नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची आणि त्याच्या वडिलांची तब्बल ४ लाख ४८ हजार ३१० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, भालचंद्र नरहरी गंगावणे (वय ६३, रा. कौडगाव, ता. जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. अज्ञात सायबर भामट्यांनी (मोबाईल क्रमांक ८७५७३४४४२१ आणि ८८९८६७८९५२) गंगावणे यांच्या मुलाला ‘the royal mint7758’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले. त्यानंतर त्याला चांगल्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले.
या प्रक्रियेत भामट्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले. नोकरीच्या आशेने त्यांनी एकूण ४,४८,३१० रुपये भरले. मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही त्यांना कोणताही मोबदला किंवा नोकरी मिळाली नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी भालचंद्र गंगावणे यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून, सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ठळक मुद्दे:
-
फिर्यादी: भालचंद्र नरहरी गंगावणे (वय ६३, रा. कौडगाव, जि. धाराशिव)
-
फसवणुकीची रक्कम: ₹ ४,४८,३१०
-
गुन्ह्याची पद्धत: टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करून नोकरीचे आमिष दाखवणे
-
पोलीस ठाणे: सायबर पोलीस ठाणे, धाराशिव







