धाराशिव – एका आश्चर्यकारक प्रसंगाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे! श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील सिस्टीम अॅनालिस्ट ओंकार काटकर यांची प्रतिनियुक्ती रद्द होऊन सहा महिने उलटले, पण ते आजही उपविभागीय अधिकारी कार्यालय, धाराशिवमध्ये खुर्ची सांभाळून आहेत!
सहा महिने उलटले, पण अद्याप बदल नाही!
९ सप्टेंबर २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांनी काटकर यांच्या प्रतिनियुक्तीला रामराम ठोकण्याचा आदेश काढला. शारदीय नवरात्र महोत्सव आणि प्रशासकीय सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं गेलं होतं. आदेशात त्यांना तात्काळ तुळजापूरला परतण्याचा स्पष्ट निर्देश देण्यात आला. पण प्रत्यक्षात… काटकरसाहेब अद्याप धाराशिवमध्ये कार्यरत!
“प्रशासन झोपलंय की दुर्लक्ष करतोय?”
गंमत म्हणजे, काटकर हे तांत्रिक (IT) कर्मचारी असूनही त्यांच्यावर महसूल विभागातील अपील (ROR) सारखी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महसूल कायद्याचा गंध नसलेल्या व्यक्तीला ही जबाबदारी देणं, हेच मुळी संशयास्पद आहे.
“भाविकांची देणगी प्रशासनाच्या सोयीसाठी?”
काटकर यांचे वेतन तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून दिलं जातं, जे श्रद्धेने दिलेल्या देणगीतून येतं. मंदिराच्या सेवेसाठी असलेल्या कर्मचाऱ्याला महसूल विभागात ‘अपील ऑफिसर’सारखी भूमिका दिली जाते, हे भाविकांच्या भावनांशी खेळ नाही का?
शिवसैनिकांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना सवाल!
या प्रकरणावर शिवसेनेच्या (शिंदे गट) शिवसैनिक अमोल जाधव यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज पाठवून तत्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर पाऊल न उचलल्यास पुढील कायदेशीर पावलं उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रश्न अनेक, उत्तर कोण देणार?
- प्रतिनियुक्ती रद्द करूनही काटकरसाहेब धाराशिवमध्येच का?
- महसूल विभागाचा अनुभव नसताना त्यांच्याकडे ‘अपील’सारखी जबाबदारी का?
- मंदिराच्या निधीतून वेतन मिळत असूनही ते महसूल विभागात कार्यरत कसे?
प्रशासनाला जाग येणार की नाही?
धाराशिव प्रशासन यावर काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण एका गोष्टीची खात्री आहे – हा विषय असाच तोंडदेखलं सोडला जाणार नाही!